पुणे : राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) संशोधकांच्या नेतृत्वाखालील सौर भौतिकशास्त्रज्ञांच्या चमूने दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट रेडिओ दुर्बिणीचा वापर करत सूर्याची सखोल रेडिओ प्रतिमा तयार केली. या प्रतिमेतून सूर्याची अचूक आणि लहान वैशिष्ट्ये दिसून आली. मीरकॅट दूरदर्शकद्वारे झालेली ही सूर्याची पहिली निरीक्षणे असून, येत्या काळात सौर भौतिकशास्त्रात एक नवीन दालन खुले होण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कारू वाळवंटात उभारलेले मीरकॅटनामक रेडिओ दूरदर्शक संकुलाद्वारे आगामी ‘स्क्वेअर किलोमीटर ॲरे’ वेधशाळेच्या मध्य-रेडिओ लहरी वर्णपटात निरीक्षणे केली जातात. या संकुलात आठ किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात १३.५ मीटर व्यासाचे ६४ रेडिओ दूरदर्शक उभारलेले आहेत. हे दूरदर्शक गिगाहर्ट् झ कंपन संख्येच्या रेडिओ लहरींवर निरीक्षणे करतात. या वर्णपटात सूर्याचे निरीक्षण करत अत्यंत कमी वेळेत प्रतिमा निर्माण करणारी ही जगातील सर्वोत्तम दूरदर्शक सुविधा मानली गेली आहे. सूर्याचा प्राचीन काळापासून अभ्यास सुरू असला, तरी आजही त्याची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर सूर्याची रेडिओ प्रतिमा मिळवणे महत्त्वाचे मानले जात आहे.
हेही वाचा >>>अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण
रेडिओ दूरदर्शकातून आकाशातील सर्वांत तेजस्वी स्रोत असलेल्या सूर्याच्या निरीक्षणासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी निरीक्षण तंत्र विकसित करण्यात आले. या तंत्राद्वारे दूरदर्शकातून थेट सूर्याकडे निरीक्षण करण्याऐवजी दूरदर्शकाला सूर्यापासून थोड्या अंतरावर स्थिर करण्यात आले, अशी माहिती प्रा. दिव्या ओबेरॉय यांनी दिली. रेडिओ तरंगलांबीवरील सूर्य एका सेकंदापेक्षा कमी वेळात आणि जवळच्या समान रंगाच्या छटांमध्येही खूप वेगळा दिसू शकतो. त्यामुळे सूर्याची प्रतिमा मिळवण्यात अनेक प्रकारची गुंतागुंत आहे, असे प्रा. सुरजित मोंडल यांनी सांगितले.
संशोधक डॉ. देवज्योती कंसबनिक म्हणाले, की दूरदर्शक प्रणाली आणि परिघीय निरीक्षण समजून घेण्यासाठी प्रयत्न केले. तसेच दूरदर्शक प्रणाली आणि परिघीय दृष्टीच्या परिणामांचा अंदाज लावण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी खास संगणकीय सूचनावली (अल्गोरिदम) विकसित केली. त्याद्वारे सौर प्रतिमा तयार करण्यात आल्या. या प्रतिमांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांची संगणकीय आभासी प्रतिमा प्रारूपाशी तुलना केल्यावर त्यात उत्कृष्ट साम्य आढळले.