शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार करुन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला होता. या प्रकरणामुळे मागील दोन महिन्यांपासून पुण्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यामध्ये भाजपाच्या नेत्या आणि महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. त्या या प्रकरणावर सतत भूमिका मांडत होत्या. मात्र आता या प्रकरणाला वेगळच वळण मिळाले असून काल पीडित तरुणीने मला गोव्यात चित्रा वाघ यांनीच डांबून ठेवले होते असा आरोप करत या सर्वांमागे चित्रा वाघ असल्याचा आरोप केलाय.
पीडित तरुणीने केलेले हे सर्व आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावले होते. याला काही तास होत नाही, तोवर आता रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेणार असून चित्रा वाघ यांच्या बद्दलची भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचे पिडीत तरुणीने सांगितले आहे. या प्रकरणाला नवे वळण मिळाल्याने पुन्हा एकदा पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
“मी अद्यापपर्यंत चित्रा वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यासाठी मी दोन दिवसाचा वेळ घेतला आहे. तसेच मी रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेणार आहे. चित्रा वाघ आणि मोहमद अहमद या दोघांनी आमच्या भावनिक नात्याचा वापर करून घेतला. तर मला या प्रकरणाची कधी तक्रार द्यायची नव्हती,” असे पिडीत तरुणीने सांगितले आहे.
“रघुनाथ कुचिक आणि माझ्यात काही चुकीच्या गोष्टी घडल्या, काही गैरसमज झाले. यामुळे आमच्या नात्याला चुकीचे वळण मिळाले. या सर्व गोष्टीला चित्रा वाघ आणि मोहमद अहमद त्याच्यासह अन्य दोघे जण जबाबदार आहेत,” असा आरोप पीडितेने केलाय.
“चित्रा वाघ माझ्यासोबत होत्या, पण त्यामागे उद्देश वेगळे होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या माझ्याकडून हे सारं करून घेत होत्या,” असे तिने सांगितले आहे. ही तक्रार तुम्ही कोणाच्या दबावाखाली मागे तरी घेत नाही ना?, असा प्रश्न या तरुणीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “रघुनाथ कुचिक आणि माझ्यात वाद आहे. पण त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या नाहीत, त्याच गोष्टीचे आरोप केले जात आहे. हे योग्य नाही,” असं मत व्यक्त केलं.