पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गांधी हे लोकसभेच्या अधिवेशनात आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून व्यक्तीशः उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात गांधी यांच्या वकिलांनी केला होता. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले.

गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत बजावलेले समन्स त्यांच्या घरी पोहोचले होते. यापूर्वी पाठवलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाऊस न्यायालयात पोहोचल्याने ते पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधी यांना विशेष न्यायालयाकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले होते. गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी गेल्या तारखेस अर्ज दाखल केला होता. गांधी हे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर होते. न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. गांधी दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे ॲड पवार यांनी दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते.

हेही वाचा – मुंबईच्या कोअ‍ॅडजुटेर बिशपपदी जॉन रॉड्रिग्स यांची नियुक्ती

या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर सोमवारी (२ डिसेंबर) गांधी यांनी न्यायालयात हजर रहावे, असे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, गांधी सोमवारी न्यायालयात हजर झाले नाही म्हणून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट काढावे, तसेच ते समन्स मिळाल्यानंतरही हजर झाल्याने त्यांना भारतीय दंड संहितेतील कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केला आहे. राहुल गांधी हे विद्यमान खासदार व लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत चर्चेसाठी येणार आहेत. गांधी हे एका महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांना लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून न्यायालयात उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालायाने मुदतवाढ दिली आहे, असे राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : बिबट्याचा घरातील शिरकाव रोखण्यासाठी सौर कुंपण लाभदायी, बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी जुन्नर वनविभागाची क्लुप्ती

दाव्याचा निकाल लागेपर्यंत अवमानकारक वक्तव्य करु नये

गांधी यांनी एका भाषणात पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले, असे ॲड. कोल्हाटकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. जोपर्यंत या दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य, तसेच वादग्रसत विधान करू नये, असे त्यांना सांगावे, असे न्यायालयाने गांधी याचे वकील ॲड. पवार यांना सूचित केले. ॲड. पवार यांनी दाखल केलेला अर्ज मान्य करत न्यायालयाने मुदतवाढ दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.