राहुल गांधी आता पप्पू राहिले नसून ते चांगले नेते झाले आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, २०१४ च्या निवडणूक प्रचारावेळी राहुल गांधी यांचे भाषण सुरु झाल्यावर लोक चॅनेल बदलत होते. मात्र, आता तेच नागरिक त्यांचे भाषण ऐकत आहेत, त्यांच्या सभांना गर्दी करत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आणि त्यांचे समर्थक वारंवार चहा विकणारी व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाल्याचे सांगत आहेत. मात्र, हेच जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा याचा प्रचार त्यांनी असा केला नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आपण वयाच्या २० व्या वर्षापासून राजकारणात आलो, असे स्वतः पंतप्रधान सांगतात. त्यांची जन्मतारीख तपासल्यास वडनगरमध्ये १९७३ मध्ये रेल्वे आली त्यामुळे त्यांनी कधी चहा विकला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनेक नेते परिस्थितीचा सामना करून राजकारणात उच्च पदावर पोहोचले आहेत. तसेच राजकारणात गरिबीचे भांडवल करू नये, असे राऊत यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी काल कोल्हापूरात शिवसेनेवर भूमिका मांडली याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मी याबाबत ऐकलेले नाही, राज्यात खूप सारे विषय असून स्वाभिमानाच्या गोष्टी कुणाच्या तोंडी शोभतात, अशा शब्दांत त्यांनी राणेंचा समाचार घेतला.

भाजप खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले की, पटोले यांनी मागील तीन वर्षांपासून कायमच विविध व्यासपीठावर शेतकऱ्यांची भूमिका मांडली. मात्र, अखेर त्यांनी काल खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. यामधून त्यांचा सरकारविरोधातील उद्रेक दिसून आल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.

या सरकारने ३ हजार कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च केले आहे. मात्र, सरकारने काहीच काम केलेले नसून फक्त कर्जमाफीच्या जाहिराती केल्या आहेत. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Story img Loader