पुणे : ‘जोपर्यंत आहे नरेंद्र मोदी आणि माझी जोडी, पुढे जाणार नाही राहुल गांधी यांची गाडी’ अशी कविता करत आमचे सरकार पाच वर्षं चालणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. राहुल गांधी आता थोडे हुशार झाले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
शिक्षण प्रसारक मंडळी, श्रमिक ब्रिगेड यांच्यातर्फे लेडी रमाबाई सभागृहात विद्यार्थी संवाद कार्यक्रमात आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार अशा चर्चेला उत आला हाेता. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले असून पाच वर्षे सरकार चालणार आहे. विकास कामे हाेत आहेत. भारताची अर्थव्यवस्था तीन क्रमांकावर आणून गरीब माणसाला ताकद द्यायची आहे. त्यासाठी याेजना राबविणार आहे. गेल्या दहा वर्षांत २५ काेटी लाेकांना गरीबी रेषेच्या वर आणले आहे.
हेही वाचा – शहरबात : आरोग्य यंत्रणांमध्ये सुस्तावलेपणाची साथ
युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. मुलांपेक्षा मुली हुशार असतात हे विविध परीक्षांच्या निकालांतून दिसते. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अत्याचार करणाऱ्यांची राक्षसी मनोवृत्ती संपवण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, असेही आठवले म्हणाले.