पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील तारखेला म्हणजे १९ ऑगस्ट रोजी पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवारी दिला. राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दावा दाखल केला होता. विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल नुकताच न्यायालयात सादर केला. त्यामध्ये राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा – ‘पीएसआय’चा निकाल ‘एमपीएससी’कडून जाहीर, पुणे जिल्ह्यातील उमेदवार राज्यात प्रथम!

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा – गुड न्यूज ! म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ

आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, त्याप्रमाणे राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे असे सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi ordered to appear before pune court controversial statement about savarkar case pune print news vvk 10 ssb
Show comments