पुणे : ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ असल्याची टीका माहिती व प्रसारणमंत्री आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केली. पक्षामध्ये कोणी ऐकत नाही म्हणून परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ते केंद्र सरकारची आणि भारताची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आलेल्या ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लेह-लडाख भारताचा भाग नाही का याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली. काँग्रेस नेतृत्वामध्ये बदल झाला असला तरी सत्ता एकाच परिवाराची आहे. काँग्रेस भवनमध्ये एकाच परिवाराची छायाचित्रे हे त्याचेच प्रतीक आहे, याकडे लक्ष वेधून ठाकूर म्हणाले, तीन राज्यांतील पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केलेली टीका ही केवळ वैफल्यातून आलेली नाही. तर, त्यामागे मतपेढी जपण्याचे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविण्याचे राजकारण आहे.
सैनिकांबद्दल राजस्थानमध्ये त्यांनी काढलेले उद्गार, पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी लष्कराविषयी केलेले भाष्य यातून लष्कराचे खच्चीकरण करण्याचेच त्यांचे प्रयत्न दिसतात. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांना अटक झाली असली तरी त्यामागचा खरा सूत्रधार अरविंद केजरीवाल असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. दारुवरचे कमिशन चार टक्क्यांवरून १२ टक्के करण्यासाठी जनादेश मिळाला होता का?, असा सवाल त्यांनी केला. कर्नाटकामध्ये सक्तवसुली संचालनालयाची नव्हे तर लोकायुक्तांनी कारवाई केली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.