पिंपरी : पिंपरी-चिवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर पडला आहे. कलाटे यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चेनंतर पुढची दिशा ठरविली जाणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कलाटे यांनी तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. पण, तिन्हीवेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०२३ च्या पोटनिवडणुकीत कलाटे यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. कलाटे हे शिवसेनेचे शहरप्रमुखदेखील होते. २०१७ मध्ये वाकडमधून ते पहिल्यांदाच पालिकेवर निवडून आले होते. त्यांनी गटनेतेपद भूषविले आहे.
हेही वाचा – दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी; पुण्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा
कलाटे यांनी समर्थक माजी नगरसेवक नवनाथ जगताप, संपत पवार, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे यांच्यासह रविवारी रात्री मुंबई गाठली. मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. परंतु, पक्षप्रवेश झाला नाही. खासदार बारणे यांच्याशी चर्चा करूनच त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे कलाटे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे.
“भविष्यात चांगला सहकारी मिळणार”
कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत चर्चा करून ते दिशा ठरविणार आहेत. त्यांच्यासारखा चांगला सहकारी भविष्यात मिळणार आहे, याचा मनापासून आनंद असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
हेही वाचा – एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मी सहकाऱ्यांसोबत मुख्यंमत्र्यांची भेट घेतली. सर्वसामान्य जनतेशी मिसळणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नेते, खासदार चर्चा करून पुढे कसे काम करायचे याची दिशा ठरवतील. – राहुल कलाटे