पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्तिगत फोन केले. मात्र, कलाटेंनी या दोन्ही नेत्यांची विनंती नाकारत अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीला धक्का बसला आहे. या निर्णयाच्या घोषणेनंतर राहुल कलाटेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
राहुल कलाटे म्हणाले, “चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि विविध पक्षातील काही नेते ज्यांनी मला माघार घेण्याबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटले त्यांच्याविषयी मी आदर व्यक्त करतो. परंतु, चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच आवडली नसती. त्यामुळेच चिंचवडच्या जनतेतून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात रेटा होता की, मी लढलं पाहिजे.”
“१ लाख १२ हजार जनतेचं त्यांचं शेवटचं मत राहुल कलाटेला दिलं होतं”
“याच १ लाख १२ हजार जनतेचं शेवटचं मत राहुल कलाटेला दिलं होतं. त्यावेळी संपूर्ण देशात भाजपाची लाट होती. दिवंगत आमदारांचा या भागातील लोकांवर प्रचंड दबाव होता. महापालिका, राज्य आणि देशातही भाजपाची सत्ता होती. असं असताना इतक्या लोकांनी मला मतदान केलं. याच लोकांचा आज मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह होता,” असं राहुल कलाटे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “राहुल कलाटेला कुणाची फूस? याबाबत माहिती घेऊ” असे सांगताना अजित पवारांनी पत्रकारांना दिली तंबी
“तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको”
“प्रत्येकाचं एकच मत होतं की, राहुल तू लढलं पाहिजे. तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचा आदर करणं मला क्रमप्राप्त होतं. ही लोकभावना आणि पाठिंबा याच्या बळावर मी निवडणुकीला सामोरं जात आहे,” असंही राहुल कलाटेंनी नमूद केलं.