लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महाविकास आघाडीचा पिंपरी मतदारसंघातील तिढा सुटल्यानंतर आता चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातीलही तिढा सुटला आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटले आहेत. या पक्षाकडून चिंचवडमधून राहुल कलाटे तर भोसरीतून अजित गव्हाणे यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. तर, पिंपरीतून शनिवारीच माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली आहे.
महायुतीने शहरातील उमेदवार जाहीर करून आठ दिवस झाले. परंतु, महाविकास आघाडीतील गोंधळ कायम होता. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली होती. मुंबई, पुण्याच्या फेऱ्या सुरू होत्या. चिंचवडमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून लढण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे इच्छुक होते. त्यांच्या उमेदवारीसाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आग्रही राहिले. अखेरीस कलाटे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, चारवेळा..!
शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात भोसरीच्या जागेवरून रस्सीखेच दिसून येत होती. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे, भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आलेले रवी लांडगे हे इच्छुक होते. दोन्ही पक्ष जागा सोडण्यास तयार नाहीत. गव्हाणे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह समर्थक माजी नगरसेवकांना घेऊन जात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले. अखेरीस गव्हाणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता रवी लांडगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाला भोसरी लगतचा खेड-आळंदी मतदारसंघ दिला आहे.