पुणे : बौद्धविद्येचे श्रेष्ठ अभ्यासक राहुल सांकृत्यायन यांनी नव्वद वर्षांपूर्वी तिबेटमधील वास्तव्यात ‘मध्यमकहृदय’ या संस्कृत ग्रंथाची प्रत स्वतः लिहून भारतात आणली. त्यानंतर ही प्रत संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. श्रीकांत बहुलकर यांच्या संग्रहात होती. प्रा. बहुलकर यांनी या दुर्मीळ ग्रंथाची प्रत आणि अन्य संशोधन सामग्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाकडे सुपूर्त केली असून, विभागाच्या नियोजित संग्रहालयात हा दुर्मीळ संग्रह ठेवण्यात येणार आहे.
विद्यापीठातील पाली विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर यांनी ही माहिती दिली. एका अनौपचारिक कार्यक्रमात डॉ. बहुलकर यांनी मौलिक संस्कृत साहित्य पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाला दिले. प्रा. प्रदीप गोखले, विभागातील अभ्यागत प्राध्यापिका आणि कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठाच्या प्रा. मधुमिता चट्टोपाध्याय, डॉ. लता देवकर, अमेरिकेतील फुल-ब्राईट नेहरू संशोधिका डॉ. लॉरेन बाउश या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : Aditya L1 : ‘सूट’ दुर्बिणीद्वारे सूर्याची अतिनील किरणे, तापमानाचा अभ्यास
सांस्कृत्यायन यांच्या हस्तलिखित ग्रंथासंबंधी प्रा. देवकर यांनी माहिती दिली. ‘महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी १९३० च्या दशकात चार वेळा तिबेटची यात्रा करून तेथील बौद्ध विहारांतील शेकडो बौद्ध ग्रंथांची छायाचित्रे काढली. तो संग्रह पाटण्याच्या बिहार रीसर्च सोसायटीला प्रदान केला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेलेल्या भावविवेक या बौद्ध पंडिताच्या ‘मध्यमकहृदय’ या ग्रंथाचे एकमेव हस्तलिखित सांकृत्यायन यांना तिबेटमध्ये सापडले. त्या हस्तलिखिताची छायाचित्रे काढणे शक्य न झाल्याने सांकृत्यायन यांनी त्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत तयार केली.
हेही वाचा : राज्यात पावसाचे पुनरागमन?
भारतात परत आल्यावर त्यांनी ती प्रत पुण्यातील बौद्धविद्या आणि तिबेटी भाषेचे विद्वान प्रा. वा. वि. गोखले यांना दिली. प्रा. गोखले यांनीही सांकृत्यायन यांच्या हस्तलिखित प्रतीची आणखी एक प्रत तयार केली. प्रा. गोखले यांनी त्या ग्रंथाच्या संपादन आणि अनुवादाचे काम सुरू करून जगातील अनेक विद्वानांना त्या कामी सहभागी करून घेतले. त्या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणाच्या संपादनाच्या कामात प्रा. श्रीकांत बहुलकर सहभागी झाले. तो भाग १९८४ मध्ये कोपनहेगन येथून प्रसिद्ध झाला. त्यानंतर प्रा. गोखले यांनी ती हस्तलिखिते आणि संबंधित सामग्री प्रा. बहुलकर यांच्या स्वाधीन केली. आता गेली चाळीस वर्षे जतन करून ठेवलेला हा संग्रह प्रा. बहुलकर यांनी पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाकडे अभ्यासकांच्या उपयोगासाठी सुपूर्त केला आहे, असे प्रा. देवकर यांनी सांगितले.