ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युटचं विश्वस्त पद सोडलं आहे. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला, त्याच्या पत्नीला तसंच अनेक सरदारांना लाच दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून वगैरे सुटले नाहीत असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलं होतं. राहुल सोलापूरकर यांनी या प्रकरणी माफीही मागितली होती. आता त्यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या राजीनाम्याची बातमी समोर आली आहे.
राहुल सोलापूरकर यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असं काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिलं गेलं. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचं. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही”, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. यावरुन सर्व स्तरांवर त्यांच्यावर टीका करण्यात आली. ज्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्या माफीनाम्यानंतर आता त्यांनी भांडारकर इन्स्टिट्युट पुणेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे.
राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केली दिलगिरी
दरम्यान, लाच शब्द वापरल्याबद्दल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “साम-दाम-दंड-भेद या चारही बाबतींत छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले यावर मी वेगळं काही संगायची गरज नाही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिकाही मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. सगळा इतिहास अभ्यासून. जगभर गेली अनेक वर्षं वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्यानं मी दिली आहेत. जगभरातल्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचं माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला असं म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे”, असं राहुल सोलापूरकर स्पष्टीकरणाच्या व्हिडीओत म्हणाले आहेत.