राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी नको ही मागणी बरोबरच आहे; पण त्यासाठी आपले तीनशे खासदार निवडून आले पाहिजे. आपल्याला पूर्ण बहुमत मिळाले, तरच कोणाबरोबर आघाडी करावी लागणार नाही, अशी भूमिका मांडत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी एकहाती सत्ता आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसजनांना केले.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मिळून २२ जिल्ह्य़ांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी राहुल यांनी बुधवारी येथील बालेवाडी क्रीडासंकुलात संवाद साधला आणि वेगवेगळ्या बैठकांमध्ये मार्गदर्शनही केले. तीन-तीन जिल्ह्य़ांच्या एकत्रित बैठकांमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी दिली जात होती. काँग्रेसची ताकद अनेक ठिकाणी वाढली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला त्रास दिला जात आहे, काँग्रेसने आता स्वबळावरच लढले पाहिजे, अशा शब्दात पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यांची भावना राहुल यांच्याजवळ व्यक्त करत होते.
या तक्रारीबाबत राहुल यांनी सांगितले, की आपल्याकडे पूर्ण बहुमत नसल्यामुळे प्रादेशिक पक्षांशी आघाडी करावी लागत आहे. त्यासाठी केंद्रात स्वबळावर आपल्या तीनशे जागा निवडून आल्या पाहिजेत. पूर्ण बहुमत मिळणार असेल, तर मग राष्ट्रवादी, एआयडीएमके अशा कोणत्याच प्रादेशिक पक्षाशी आपल्याला आघाडी करावी लागणार नाही. त्यासाठी एकहाती सत्ता आणावी लागेल आणि ती जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.
प्रदेश कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राहुल यांची भाषणे झाली. या वेळी राहुल म्हणाले, की यापूर्वीच्या सन २००४ आणि ०९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र, दोन्ही वेळा काँग्रेसचीच सत्ता आली. वैचारिक लढाई देत आपल्याला आगामी निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सत्ता काँग्रेसचीच येणार असली, तरी पक्षात तू तू, मैं मैं चालणार नाही. तसेच कोणी पक्षाशी दगाफटका केला, तर निश्चितच दखल घेतली जाईल. जो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे त्याला ओव्हरेटक करून पुढे आणा.
दिल्ली में तो हमारा कुडम्ता पकडते है..
राष्ट्रवादीकडून होत असलेल्या त्रासाबद्दल एका पदाधिकाऱ्याने तक्रार मांडल्यानंतर राहुल गांधी त्याच्याजवळ गेले आणि त्या पदाधिकाऱ्याचा झब्बा चिमटीत पकडत ‘वो (राष्ट्रवादी) दिल्ली में तो हमारा कुडता पकडते है और यहाँ आपको तकलीफ देते है’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी नको, तर काँग्रेसला तीनशे जागा मिळाल्या पाहिजेत
राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी नको ही मागणी बरोबरच आहे; पण त्यासाठी आपले तीनशे खासदार निवडून आले पाहिजे.
First published on: 26-09-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul wants 300 seats in parliament