लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री छापा टाकला. पोलीस आयुक्तांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाच खडक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत ६० जणांना ताब्यात घेतले, तसेच मोबाइल संच, एक लाख दोन हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. याच परिसरात असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावर कारवाई करुन तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

छत्रपती शिवाजी रस्त्यावर सराइत नंदू नाईक याच्या जनसेवा भोजनलयाच्या इमारतीत शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत ६० जणांना ताब्यात घेण्यात आले. मध्यभागात नंदू नाईक हा ‘मटका किंग’ या टोपण नावाने ओळखला जातो. त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डे आहेत. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर जुगार अड्डे काही दिवस तात्पुरते बंद ठेवले जातात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा सुरु होतात. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री गु्न्हे शाखेने छापा टाकून एक लाखांची रोकड जप्त केली. याप्रकरणी ६० जणांना ताब्यात घेतले. याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात छापा टाकून कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवसांतच नाईकने पुन्हा जुगार अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेतील तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगेसह पत्नीवर गुन्हा

आदेश धुडकावून छुपे धंदे

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील जुगार, मटका अड्डे बंद करण्याचे आदेश दिले. अनेक भागात छुप्या पद्धतीने बेकायदा धंदे सुरू राहत आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत. सर्वाधिक बेकायदा धंदे परिमंडळ चार आणि पाचमध्ये सुरू आहेत. मध्यभागातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेने मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मध्यभागातील फरासखाना, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत छुप्या पद्धतीने जुगार अड्डे सुरू आहेत. गैरप्रकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.