लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : औंध भागातील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत थायलंडमधील चार तरुणींसह नऊ जणींना ताब्यात घेण्यात अले. मसाज पार्लर मालकासह चौघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
औंध भागातील मुरकुटे प्लाझा इमारतीतील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली. पोलिसांच्या पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील चार तरुणी, तसेच महाराष्ट्र, गुजरातमधील पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये मसाज पार्लरचा मालक, व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदूम आणि पथकाने ही कारवाई केली. शहर, तसेच उपनगरातील मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्यचा इशारा दिला आहे. मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.