पुणे : लोणी काळभोरजवळील कदमवाकवस्ती परिसरात पेट्रोल चोरट्यांच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन टँकरसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आली. या प्रकरणी धीरज विठ्ठल काळभोर (वय ३६), अमीर मलिक शेख (वय ३२), सचिन भाऊराव सुरवसे (वय ३० ), विजय मारुती जगताप (वय ५२), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१), इसाक इस्माइल मजकुरी (वय ४२, सर्व रा. कदमवाक वस्ती, ता. हवेली ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. पेट्रोल चोरट्यांना जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी महेश बबन काळभोर (वय ४२, रा. कदमवाकवस्ती) याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे : तडीपार गुन्हेगाराकडून शहरात अमली पदार्थांची विक्री; तिघांना अटक; साडेपाच लाखांचे अमली पदार्थ जप्त
हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधीच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात भाजपच्या वतीने आंदोलन
लोणी काळभोर परिसरात पेट्रोल कंपन्या आहेत. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांशी संगनमत करुन त्यातील पेट्रोल चोरुन त्याची बेकायदा विक्री केली जाते. लोणी काळभोरमधील कदमवाकवस्ती परिसरात भारत टायर्स या दुकानाच्या पाठीमागे दोन टँकरमधून पाच ते सहा जणांकडून पेट्रोल काढण्यात येत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण आणि पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथून दोन टँकर आणि पेट्रोल असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.