लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लोणी काळभोर भागातील रामदरा परिसरात असलेल्या गावठी दारू तयारी करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दीड हजार लिटर दारू, २० हजार लिटर रसायन, तसेच अन्य साहित्य असा अकरा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी रामदरा परिसरात मध्यरात्री कारवाई केली. अंधाराचा फायदा घेऊन गावठी दारू तयार करणारा आरोपी मुकेश कर्णावत पसार झाला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. लोणी काळभोर भागात गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी रामदरा परिसरात कर्णावत गावठी दारू तयार करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. तेथून दीड हजार लिटर गावठी दारू आणि २० हजार लिटर रसायन, दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
गु्न्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबे यांनी ही कारवाई केली. पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर, नगर रस्ता भागातील निर्जन ठिकाणी सराइतांकडून गावाठी दारु तयार केली जाते. यापूर्वी अशा अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. गावठी दारु तयार करुन शहरातील वस्तीभागात विक्रीस पाठविली जाते. अनेक कष्टकरी गावठी दारु पितात. गावठी दारु निर्मितीसाठी लागणारी रसायने, काळा गूळ बाजारातून खरेदी केला जातो. गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारी रसायने अपायकारक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून गावठी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिसांनी गावठी दारु तयार करणाऱ्या सराइतांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करुन त्यांना कारागृहात स्थानबद्ध केले होते. गावठी दारु तयार करणाऱ्या टोळ्या ग्रामीण भागात सक्रीय आहेत. गावठी दारु तयार करणाऱ्यांविरुद्ध यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.