पुणे : रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये ‘रेलनीर’ या अधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जाते. परंतु, ऐन उन्हाळ्यात रेलनीरची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अखेर रेल्वेला इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्याची परवानगी देण्याची वेळ आली आहे. रेलनीरच्या पुरवठ्यात मुंबईला प्राधान्य दिले जात असल्याने पुण्यात ही टंचाई आहे. दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या निर्माण होत असल्याने पुण्यात रेलनीरचा प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू आहे.
हेही वाचा >>> पुणे: ‘कोळशा’मुळे मध्य रेल्वे कोट्यधीश!
‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’कडून (आयआरसीटीसी) रेलनीरचा पुरवठा केला जातो. रेलनीरचा प्रकल्प अंबरनाथला आहे. या प्रकल्पातून रेल्वेचा मुंबई विभाग, पुणे विभाग आणि सोलापूर विभागांना रेलनीरचा पुरवठा केला जातो. उन्हाळा वगळता वर्षभर हा पुरवठा सुरळीतपणे सुरू असतो. उन्हाळ्यात रेलनीरची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अंबरनाथ येथील प्रकल्पातून होणारा पुरवठा कमी पडू लागतो.
हेही वाचा >>> पुणे मेट्रोची स्थानके सुरक्षित!… महामेट्रोने ‘या’ आधारे केला हा दावा
दरवर्षी उन्हाळ्यात अंबरनाथ प्रकल्पातून प्रामुख्याने मुंबई विभागाची रेलनीरची गरज पूर्ण केली जाते. यामुळे पुणे आणि सोलापूरला रेलनीरचा मागणीएवढा पुरवठा होत नाही. उन्हाळ्यामुळे रेलनीरची मागणी वाढली असताना टंचाईमुळे प्रवाशांचे हाल होतात. यासाठी आता मध्य रेल्वेने इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. यात ऑक्सिमोअर ॲक्वा, रोकोक्को, हेल्थ प्लस, गॅलन्स, निम्बूज, ऑक्सी ब्ल्यू, सन रिच, एल्विश, इयोनिटा यांचा समावेश आहे.
पुणे स्थानकावर दिवसाला १२ हजार बाटल्या
पुणे स्थानकावर एका दिवसाला सध्या रेलनीरच्या एक हजार बॉक्सची मागणी आहे. एका बॉक्समध्ये १२ बाटल्या असतात. त्यामुळे दिवसाला सरासरी सुमारे १२ हजार बाटल्यांची स्थानकावर विक्री होते. आता त्यातील निम्मीच मागणी रेलनीरकडून पूर्ण केली जात आहे.
कोट
उन्हाळ्यामुळे प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात रेलनीरची टंचाई निर्माण होते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
– डॉ.मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक