रेल्वे गाडय़ा किंवा रेल्वे स्थानकाचा परिसर म्हणजे हक्काने घाण करण्याची जागा, असाच काहींचा समज झाला आहे. त्यामुळे स्थानकाच्या परिसरामध्ये कितीही स्वच्छता केली तरी, त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रेल्वेने मागील काही दिवसांपासून घाण पसरविणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवले आहे. मागील चार महिन्यांपासून याबाबत धडक मोहीम राबविण्यात येत असून, त्यात ४२८ प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्यात आली आहे.
पान खाऊन पिचकाऱ्या मारून रंगलेल्या भिंती, परिसरामध्ये पडलेले खाद्यपदार्थाचे कागद, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, दोन फलाटाच्या मधल्या जागेतून येणारी प्रचंड दुर्गंधी.. असे साधारण चित्र रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये दिसून येते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेबाबत किती लक्ष ठेवले जाते, यापेक्षाही स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचा बेजबाबदारपणा या अस्वच्छतेला कारणीभूत असल्याचे आजवर दिसून आले आहे. रेल्वेच्या वतीने सध्या पुणे स्थानकात खासगी पद्धतीने स्वच्छतेचे काम करण्यात येते. या कामावरही प्रशासनाकडून लक्ष देण्यात येते. मात्र, ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी प्रवाशांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाच्या परिसरात थुंकणे, कचरा टाकणे आदी गोष्टींना बंदी आहे. फलाटावरील कचरा कुंडय़ांमध्येच कचरा टाकावा, अशा सूचना लिहिण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फलाटावर गाडी उभी असताना गाडीतील स्वच्छतागृहाचा वापर करू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फलाटाच्या परिसरात दरुगधी पसरविण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरले. त्यामुळे या सूचना न पाळणाऱ्या प्रवाशांवर आता जाणीवपूर्वक लक्ष ठेवण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात या कारवाईमध्ये ८८ प्रवाशांना पकडण्यात आले. मे महिन्यात ७२, जूनमध्ये १२९, तर जुलैमध्ये १३९ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४२ हजार ८०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. रेल्वे परिसरात विविध प्रकारे अस्वच्छता करण्याबरोबरच गाडय़ांमध्ये व परिसरात पोस्टर, स्टीकर चिटकविण्यासही बंदी आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा