पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये पाण्याच्या बाटल्यांसह इतर वस्तूंची जास्त किमतीने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वेने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेक अनधिकृत विक्रेते, फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. ते छापील कमाल किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळतात. पाण्याच्या बाटलीची विक्रीही जादा दराने केली जात असल्याची तक्रारही प्रवासी वारंवार करतात. तसेच अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करतात. या बाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी करून विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार रेल्वेने अवैध विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई केली.
हेही वाचा – पुण्यात तिकीट तपासनिसांना बॉडीकॅमची प्रतीक्षा
स्थानकावरील १४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या हवाली करण्यात आले. हे विक्रेते स्थानक परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या विकत होते. तसेच ते प्रवाशांकडून जेवणाच्या ऑर्डरही घेत होते. अवैध विक्रेत्यांकडून पाण्याच्या ६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी आणि अन्नपदार्थ निरीक्षण पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत रेल्वे सुरक्षा दलही सहभागी झाले होते.