पुणे : रेल्वे स्थानकावरून प्रवास करताना निर्धारित वेळेनुसार येणारी गाडी कोणत्या ‘प्लॅटफॉर्म’वर येणार आहे, याची कल्पना आता रेल्वे प्रवाशांना एक तास अगोदर समजणार आहे. मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाने अचानक गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ नये, प्रवाशांची धावपळ होऊ नये, म्हणून व्यवस्थापनासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अर्ध्या तासापर्यंत किंवा पंधरा मिनिटे अगोदर अथवा अचानक स्थानक बदलण्यात आल्याची माहिती देण्यात येत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे रेल्वे स्थानकावर सहा ‘प्लॅटफॉर्म’ आहेत. दिवसभरातून एक्सप्रेस, लोकल डेमू, पॅसेंजर अशा २०० गाड्या येथून धावतात. दीड लाखा्हूंन अधिक प्रवासी प्रवास करतात. गेल्या पाच ते सहा महिन्यांत प्रवाशांची संख्या वाढली असून, तुलनेत गाड्यांची संख्या कायम आहे. रेल्वे प्रवाशांनी नियोजित वेळापत्रकापेक्षा एक तास अगोदरपासून उपस्थिती लावलेली असते. अनेक प्रवाशांना गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे किंवा येणार आहे, याची कल्पना नसते.

सध्या गाडी कोणत्या स्थानकावर येणार याची माहिती अर्धा तास अगोदर देण्यात येत आहे. तत्पूर्वी प्रवासी सामान घेऊन रेल्वे प्रवेशद्वाराबाहेरील बाजूस उभे राहतात. स्थानक निश्चित झाल्यानंतर तेथे जाण्यासाठी धावपळ करतात. असे घाईघाईने जाणे अनेकदा जिकिरीचे ठरते. ज्येष्ठ प्रवाशांची गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि ऐन वेळी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजित गाड्यांचे ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक एक तास अगोदर जाहीर करण्यासाठी विशेष प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी आणि प्रवाशांचा सुलभ प्रवासाच्या व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस सुरक्षा बल (आरपीएफ) यांना नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांनी एक तास अगोदर येऊन रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये. – पद्मासिंह जाधव, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग