पुणे रेल्वे स्थानकाला केवळ ‘वर्ल्ड क्लास’चा दर्जा देण्यात आला, पण त्या दर्जाच्या सुविधा कधीच मिळाल्या नाहीत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विविध मार्गाचा विस्तार व गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी होत असतानाच ‘वर्ल्ड क्लास’नुसारच प्रवाशांना पुणे रेल्वे स्थानकात सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा गुरुवारी जाहीर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वेच्या पुणे विभागातून आता रेल्वेला वर्षांला सुमारे आठशे कोटी रुपयांचा महसूल दिला जातो. पण, दर वर्षीचा रेल्वे अर्थसंकल्प पाहता पुणेकरांना ठेंगाच मिळत असल्याचे वास्तव आहे. नव्या सरकारकडून तरी महत्त्वाच्या अपेक्षा पूर्ण होतील, याकडे पुणेकर प्रवासी डोळे लावून बसले आहेत. पुणे-मुंबई दरम्यान प्रवासाची वाढती गरज व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या मार्गावर जादा गाडय़ा सुरू होण्यासाठी तसेच पुणे-लोणावळा लोकलचा विस्तार करण्यासाठी पुणे-लोणावळा दरम्यान लोहमार्गाच्या तीन पदरीकरणाची निकड आहे. मागील अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाचा विषय आला होता. मात्र, निधीच न मिळाल्याने हे काम पुढे जाऊ शकले नाही. पुणे-नाशिक नव्या मार्गासाठीही निधी रखडला आहे. हा निधी मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
पुणेकरांच्या अपेक्षांबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा यांनी सांगितले, पुणे स्थानकात ‘वर्ल्ड क्लास’नुसारच सुरक्षा, खानपान व इतर सुविधा अपेक्षित आहेत. पुणे विभागाला झोनचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे मेट्रो व मोनोरेलसाठी स्वतंत्र झोन झाल्यास या सुविधांसाठी रेल्वेकडून स्वतंत्र निधी मिळून, हे प्रकल्प मार्गी लागू शकतील. पुणे-मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा विषय संसदेत आला होता. त्यामुळे हा प्रकल्पही मार्गी लागला पाहिजे. पुणे-लोणावळा, दौंड, बारामती, नगर, सातारा या मार्गावर लोकल किंवा शटल सेवेची नितांत गरज आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेचा प्रवास सुरक्षित व स्वस्तात असल्याने या मार्गाचा विकास प्रवाशांची गरज आहे. पुणे शहराच्या आसपास रेल्वेच्या कोचचा तसेच सुटय़ा भागांचा कारखाना आल्यास या परिसरातील अनेकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो.
मागील अर्थसंकल्पात विविध गाडय़ा सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यातील केवळ पुणे-लखनौ हीच गाडी सुरू होऊ शकली. पुणे-गोरखपूर, पुणे-हावडा प्रीमियम, पुणे-नागपूर, पुणे-निजामुद्दीन या गाडय़ा जाहीर झाल्या, पूर्ण वर्षभरात सुरू होऊ शकल्या नाहीत. या गाडय़ांबरोबरच लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ा पुणेकरांसाठी गरजेच्या आहेत. त्या दृष्टीनेही रेल्वे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.  

Story img Loader