पुणे : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील प्रमुख स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-चार्जिंग केंद्रे उभारण्याचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकाच्या आवारात आणि वाहनतळामध्ये ही केंद्रे उभारण्यात येत आहेत. पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानकासह शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मिरज स्थानकामध्ये लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याअंतर्गत देशातील प्रमुख स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि मोटारींसाठी चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यात प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, पुणे या शहरांचा समावेश आहे. पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत या शहरांमधील प्रमुख स्थानकांवर ई-चार्जिंग सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हेही वाचा : अजित पवारांच्या धरणग्रस्त वक्तव्यावर बोलणारे देवेंद्र फडणवीस त्याच धरणातील….. सुषमा अंधारे यांची चौफेर फटकेबाजी

पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मिरज या स्थानकांवर ही सुविधा उभारली जाणार आहे. या स्थानकांच्या वाहनतळाच्या जागेत ही सुविधा उभारण्यात येईल. पुणे रेल्वे स्थानकाच्या ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहतनळात ही सुविधा सुरू केली जाणार आहे. सध्या कोल्हापूर स्थानकाच्या वाहनतळाच्या जागेत चार्जिंग सुविधा उभारण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर ती सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा : “निवडणुकांना जेवढा उशीर होईल…”, विशेष अधिवेशनावरून रोहित पवारांचा भाजपावर मोठा आरोप

रेल्वेलाही महसूल मिळणार

पुणे विभागातील इतर स्थानकांमध्ये भविष्यात ही सुविधा सुरू केली जाणार आहे. चार्जिंग सुविधा सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहे. हे कंत्राट १ ते ३ वर्षांचे असेल. या कंपन्या त्यापोटी रेल्वेला वर्षाला ठराविक रक्कम देतील. या सुविधेमुळे प्रवाशांची सोय होण्यासोबत रेल्वेलाही महसूलही मिळणार आहे. ‘प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. पुणे विभागात सध्या चार स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात इतरही स्थानकांवर ही सुविधा सुरू केली जाईल’, असे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway ministry plan to start electric vehicle charging points at pune railway station pune print news stj 05 css
Show comments