पुणे : प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. या कक्षाचे कंत्राटही एका रुग्णालयाला देण्यात आले. त्यानंतर एका अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे या कक्षाची जागा बदलण्याचा खटाटोप रेल्वेने केला. रेल्वे प्रशासनही या अधिकाऱ्यासमोर झुकले असून, त्याच्या म्हणण्यानुसार कार्यवाही केली जात आहे. यामुळे ही चांगली योजना गुंडाळण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षाच्या उभारणीचे कंत्राट रूबी हॉल रुग्णालयाला देण्यात आले. नुकतेच रुबी हॉलचे पथक पाहणीसाठी स्थानकावर आले. त्यावेळी रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले. नंतर हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर गेला. त्यावेळी वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी उदयसिंह पवार यांनी हा विरोध केल्याचे समोर आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी निर्णय घेतलेला असतानाही हा विरोध करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा – ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना ‘जड झाले ओझे’!

पवार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने पुन्हा जागेसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि उदयसिंह पवार यांनी स्थानकात जाऊन बुधवारी (ता.२३) पाहणी केली. रेल्वे पोलीस दलाच्या पोलीस ठाण्यासमोरील वाहनतळाच्या जागी हा कक्ष उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याजागी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यास पवार यांनी पाहणीवेळीही विरोध केला. त्याऐवजी पार्सल कार्यालयाकडील एका कोपऱ्यातील जागा त्यांनी सुचविली. त्याला रुबी हॉल रुग्णालयाने नापसंती दर्शविल्याने ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

अधिकाऱ्यांची मनमानी कोण रोखणार?

रेल्वे पोलीस दलाने आता सुचविलेली जागा एका बाजूला असून, प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे ती योग्य नसल्याचे रुबी हॉल रुग्णालयाचे म्हणणे आहे. याचवेळी रेल्वेतील इतर अधिकाऱ्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. वरिष्ठांनी दिलेला आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्याची मनमानी प्रशासन खपवून घेत आहे, असा आक्षेपही अनेक अधिकाऱ्यांनी नोंदविला.

हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळेंशी संबंधित ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार संतापले, म्हणाले, “तुम्ही अक्कल…”

पुणे स्थानकावर रेल्वे पोलीस दलाच्या वाहनतळाच्या जागेत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यास आमचा विरोध नाही. रेल्वेकडून बुधवारी झालेले सर्वेक्षण ही अंतर्गत बाब आहे. याबद्दल वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील. त्यावर मला बोलता येणार नाही. – उदयसिंह पवार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त

आपत्कालीन वैद्यकीय कक्षाच्या जागेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकांवर सोपविण्यात आली आहे. ते सर्व विभागांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. – इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway officer opposition to the site for setting up a medical room in the premises of pune railway station pune print news stj 05 ssb
Show comments