पुणे : पुणे-दौंड मार्गावर उपनगरी सेवा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. ही मागणी पूर्ण होत नसल्याने आता रेल्वे प्रवाशांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दौंड भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने येथील उमेदवारांची भेट घेऊन प्रवाशांनी त्यांच्यापर्यंत मागण्या पोहोचविल्या आहेत.
पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गातील अडथळे दूर होत नसल्याचे चित्र आहे. दौंड जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यात आला असला तरी पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव अद्याप रेल्वे मंडळाकडे धूळखात पडून आहे. त्यातच पुणे ते दौंड दरम्यानच्या गाड्या हडपसरपर्यंत धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या ५० हजार आहे. त्यात विद्यार्थी, व्यापारी, भाजी विक्रेते, दूध विक्रेते यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पुणे ते दौंड उपनगरी विभाग घोषित करावा, पुणे ते दौंड दरम्यान गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, दौंड-हडपसर डेमूचा पुणे स्थानकापर्यंत विस्तार करावा आणि शिवाजीनगर-लोणावळा लोकल ही पूर्वीप्रमाणे पुणे स्थानकावरून सोडावी आणि बारामती-पुणे पॅसेंजर करोना संकटाच्या आधीच्या वेळापत्रकनुसार चालू करावी, अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत.
रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव
पुणे ते दौंड दरम्यानची उपनगरी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने रेल्वे मंडळाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास या मार्गावर डिझेल मल्टिपल युनिटऐवजी (डेमू) इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (एमू) गाड्या धावणार आहेत. डेमू गाड्या या दहा डब्यांच्या असतात. त्याच वेळी एमू गाड्यांना प्रत्येकी चार डब्यांचे किमान तीन युनिट असतात. त्यामुळे या मार्गावर किमान १२ डब्यांच्या गाड्या धावू शकतील. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
हेही वाचा – कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
पुणे ते दौंड उपनगरी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांहून अधिक रेल्वे मंडळाकडे पडून आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. खासदारही प्रवाशांच्या मागण्यांचा पाठपुरावा करीत नाहीत. त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. – दिलीप होळकर, रेल्वे प्रवासी ग्रुप (केडगाव)