लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील अवैध धंदेवाल्यांकडून मलिदा खाण्यास चटावलेल्या पोलिसांची लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांनी दखल घेतली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील खरात आणि हवालदार पठाण हे अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेत असल्याचा अहवाल दिल्यानंतर या दोघांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्रात खरात आणि पठाण हे नियुक्तीस आहेत. तीन महिन्यांपूर्वी लोणावळा रेल्वे स्थानकावर मटक्याच्या अड्डा सुरू होता. मटक्याचा धंदा चालविणाऱ्याकडे रेल्वे सुरक्षा पोलीस (आरपीएफ) अधिकाऱ्याने मोठी रक्कम मागितली होती. त्या मटक्यावाल्याने सीबीआयकडे याबाबत तक्रार केली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले होते. दरम्यान लोणावळा परिसरात पोलीस उपनिरीक्षक खरात व पठाण हे मटकेवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा अहवाल सीबीआयने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय बर्वे यांना दिला. या अहवालाची गंभीर दखल घेत बर्वे यांनी खरात आणि पठाण यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या दोघांना शनिवारी निलंबित केले.
लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील खडकी रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या मटका धंद्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या मटका धंद्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. पण, हा मटका राजरोजपणे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या मटका धंद्यावर पैसे जिंकून आलेल्या एका व्यक्तीला शिवाजीनगर परिसरात मारहाण करून लुटण्यात आले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
लोणावळा येथे अवैध धंदेवाल्यांकडून पैसे वसूल करणाऱ्या रेल्वेच्या दोन पोलिसांचे निलंबन
लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील अवैध धंदेवाल्यांकडून मलिदा खाण्यास चटावलेल्या पोलिसांची लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांनी दखल घेतली आहे.
First published on: 08-12-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway police cbi bribe suspend