अमरावतीतून एका तरुणीचे अपहरण तसेच धमकावून आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित तरुणीला लोहमार्ग पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. खासदार नवनीत राणा यांनी या आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन अमरावतीतील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भातील आपले संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचा जाब विचारुन गोंधळ घातला होता. आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी तरुणीचे अपहरण करुन तिला डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा >>> पुणे : एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न

अमरावती पोलीस ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दाखल केली होती. तरुणी पुणे परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. अमरावती पोलिसांनी तरुणीचे छायाचित्र पुणे लोहमार्ग पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, तरुणी निजामुद्दीन ते वास्को- गोवा रेल्वे गाडीने गोव्याकडे जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. रेल्वे गाडी सातारा रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. सातारा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेगाडी थांबवून लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी रात्री तरुणीला ताब्यात घेतले. तरुणी एकटी प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. तिला सातारा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तरुणीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अमरावती पोलिसांचे पथक गुरुवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले. संबंधित तरुणीला अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.– सदानंद वायसे-पाटील, पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे विभाग

Story img Loader