पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर नो-पार्किंगमध्ये सध्या लोहमार्ग पोलिसांनीच बेकायदा वाहनतळ सुरू केला आहे. स्थानकाच्या आतमधील मार्गिकांमध्ये हा वाहनतळ सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रेल्वेने वारंवार पत्रे पाठवूनही त्यावर लोहमार्ग पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. यावरून दोन्ही विभाग आमनेसामने आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे स्थानकाच्या आवारात लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्यासमोरच पदपथावर लोहमार्ग पोलिसांनी अनेक वर्षांपासून वाहनतळ सुरू केला होता. तिथे केवळ पोलिसांच्या वाहनांसाठी वाहनतळ, असा फलकही लावण्यात आला होता. हा वाहनतळ हटवून पोलिसांनी त्यांची वाहने रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयाशेजारी असलेल्या वाहनतळात लावावीत, अशी पत्रे वारंवार रेल्वे प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांनी पाठविली होती. मात्र, लोहमार्ग पोलिसांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता.

आणखी वाचा-पिंपरीतील बीआरटी मार्गातून वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड…पुन्हा चूक केल्यास भरा १५०० रुपये

लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारीच रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) पोलीस ठाणे आहे. त्यांनीही लोहमार्ग पोलिसांप्रमाणे पोलीस ठाण्यासमोर वाहनतळ सुरू केला होता. त्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचा वाहनतळ हटविण्यात आला. यानंतर लोहमार्ग पोलिसांनीही आपला वाहनतळ हटविला. परंतु, त्यांनी स्थानकातील मार्गिकेत वाहने लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या मार्गिकेत वाहतूककोंडी होऊ लागली आहे. त्याचा त्रास आता प्रवाशांना होऊ लागला आहे.

रेल्वे स्थानकाच्या आवारातील वाहनतळ लोहमार्ग पोलिसांनी हटवावा, असे पत्र रेल्वे प्रशासनाने पाठविले आहे. या वाहनतळामुळे स्थानकाच्या आवारात कोंडी होत आहे. लोहमार्ग पोलिसांना वाहने लावण्यासाठी पर्यायी जागा पार्सल कार्यालयाशेजारी देण्यात आली आहे. -डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

आणखी वाचा-कार्ड घ्या अन् मेट्रोतून बिनधास्त प्रवास करा! ‘एक पुणे कार्ड’ला प्रवाशांची पसंती

रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोरील वाहनतळ हटविण्यात आला आहे. आता पोलिसांनी दुसरीकडे कोठे वाहने लावण्यास सुरुवात केली आहे का, त्याची पाहणी केली जाईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. -श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात नो-पार्किंगमध्येच लोहमार्ग पोलिसांनी वाहनतळ सुरू केला आहे. फक्त लोहमार्ग पोलिसांच्या वाहनांसाठी अशा आशयाचा फलक तेथे लावण्यात आला आहे. यावरून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रशासन आमनेसामने आले आहेत.