मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांच्यासह मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे पथक पुणे मंडलातील स्थानके, रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा, विद्युतीकरण आदींच्या वार्षिक तपासणीसाठी मंगळवारी विशेष रेल्वेने आले होते. वार्षिक तपासणी असल्यामुळे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीयुक्त रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडून रंगरंगोटी तसेच स्वच्छता करून चकाचक करण्यात आली होती. शर्मा यांच्यासह पथकातील रेल्वेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळेगाव, चिंचवड आणि तेथून पुढे दौंडपर्यंत रेल्वेच्या स्थानकांसह इतर सुविधांची तपासणी केली.

मध्य रेल्वेच्या वतीने दर वर्षी मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांमधील विविध विभागांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तपासणी करण्यात येते. रेल्वेच्या पुणे मंडलाच्या तपासणीसाठी आलेल्या पथकामध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांच्यासह मुख्य परिचालन व्यवस्थापक डी. के. सिंग, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार, मुख्य सुरक्षा सहाय्यक ए. के. श्रीवास्तव, पुणे मंडलाचे व्यवस्थापक देवस्कर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील उदासी, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग आदी उपस्थित होते.

मध्य रेल्वेचे वार्षिक तपासणी पथक येणार असल्यामुळे पुणे मंडलाच्या रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्थानके, सीमाभिंती रंगरंगोटीने चकाचक केल्या होत्या. रेल्वे स्थानकातील भिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले होते. इतर वेळी घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी असलेली स्थानके चकाचक असल्याने रेल्वे प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

शर्मा यांच्या हस्ते रेल्वेच्या पुणे मंडलाच्या चिंचवड रेल्वे स्थानकातील संगणक परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शर्मा यांनी रेल्वे विद्युतीकरण आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. कर्मचाऱ्यांना स्वत:चे सुरक्षा बूट वापरावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर शर्मा यांनी त्या कर्मचाऱ्यांना रेल्वेकडून बूट देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

तळेगाव रेल्वे स्थानकातून पथकाने तपासणीला सुरुवात केली. गँगमन, ट्रॅकमन, सिग्नलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेने काम करण्याच्या सूचना शर्मा यांनी दिल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी यावेळी ‘मॉक ड्रील’ करून सुरक्षाविषयक प्रात्यक्षिके सादर केली. त्याची पाहणीही शर्मा यांनी केली.

विशेष तपासणी रेल्वेने आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्यासह पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत िपपरी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

प्रवासी संघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन भालदार यांनी शर्मा यांना दिले. शर्मा यांनी िपपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रवासी संघाला दिले.

Story img Loader