लोहमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेच्या वतीने अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या वर्षी पुणे विभागामध्ये जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या महिलांमध्ये तीन हजार १५९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
रेल्वे अधिनियम १४७ अनुसार अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडणे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा करताना पकडले गेल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड, तर सहा महिने साध्या कैदेची शिक्षाही होऊ शकते. पुणे विभागात विविध रेल्वे स्थानकांमध्ये त्याचप्रमाणे लोहमार्गालगत लोकवस्ती असलेल्या भागातून थेट लोहमार्ग ओलांडण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर होत असतात. त्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागतो. त्याचप्रमाणे रेल्वेच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम होतो. या गोष्टी लक्षात घेऊन अनधिकृतपणे लोहमार्ग न ओलांडण्याबाबत रेल्वेच्या वतीने जनजागृतीची मोहीमही हाती घेण्यात येते. त्याचप्रमाणे वेळोवेळी महत्त्वाच्या काही स्थानकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येते.
रेल्वेच्या वतीने या वर्षांमध्ये अनेकदा कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यात पकडलेल्या ३१५९ लोकांकडून दंडाची वसुली करण्यात आली. दंड न भरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करावा. त्याचप्रमाणे लोहमार्गाच्या कडेनेही चालणे धोकादायक असल्याने ते टाळावे. लोकवस्ती असलेल्या भागामध्ये, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पादचारी पुलाची व्यवस्था नाही, अशा भागातून लोहमार्ग ओलांडावा लागल्यास सुरुवातीला दोन्ही बाजूंना पाहावे. त्याचप्रमाणे मोबाईलवर बोलणे टाळावे व इअर फोनचा वापर करू नये, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
बेकायदा लोहमार्ग ओलांडणाऱ्या तीन हजार प्रवाशांवर कारवाई
रेल्वे अधिनियम १४७ अनुसार अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडणे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा करताना पकडले गेल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड, तर सहा महिने साध्या कैदेची शिक्षाही होऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway take action on 3000 passenger for crossing the line