लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये पाण्याच्या बाटल्यांसह इतर वस्तूंची जास्त किमतीने विक्री होत असल्याचे समोर आले होते. रेल्वेने अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. अवैध विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर रेल्वेने आता दंडुका उगारला आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेक विक्रेते छापील कमाल किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळतात. याचबरोबर अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या होत्या. पाण्याच्या बाटलीची विक्रीही जादा दराने केली जात असल्याचे अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. प्रवाशांची दिवसाढवळ्या लूट करणारे विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत होती.

हेही वाचा… पुणे- गोरखपूर दरम्यान धावणार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

अखेर रेल्वेने अवैध विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत अनधिकृत कंपनीच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री पुणे रेल्वे स्थानकात सुरू असल्याची बाब उघडकीस आली. या पाण्याची विक्री करणाऱ्या चार अवैध विक्रेत्यांना ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या हवाली करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ९७६ पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याचबरोबर पाच अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी आणि खानपान निरीक्षक पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत रेल्वे सुरक्षा दलही सहभागी झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways has initiated action against illegal sellers and hawkers at pune station pune print news stj 05 dvr