पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यांना मूलभूत सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यात सुधारणा करण्याऐवजी रेल्वेने आता सशुल्क पंचतारांकित विश्रांतीकक्ष उभारण्याचे नियोजन केले आहे.
पुणे रेल्वे स्थानकातील आरक्षण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा विश्रांतीकक्ष उभारला जाणार आहे. प्रवाशांना आलिशान आणि आरामदायी सुविधा देण्याचा रेल्वेचा यामागे हेतू आहे. या सुविधेसाठी शुल्क आकारले जाणार आहे. आरक्षण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मुख्य आरक्षण केंद्र आहे. त्या ठिकाणी हा कक्ष उभारला जाणार आहे. तिथे प्रवासी पैसे भरून पंचतारांकित सुविधांचा अनुभव घेत विश्रांती घेतील.
आरक्षण इमारतीतील तळमजल्यावर तत्काळ आणि सर्वसाधारण तिकिटांची आरक्षण केंद्रे आहेत. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सर्वसाधारण तिकीट खरेदी करण्यासाठी तळमजल्यावरील तिकीट केंद्रांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्याचवेळी पहिल्या मजल्यावरील मुख्य आरक्षण केंद्राकडे फारसे प्रवासी फिरकत नाहीत. त्यामुळेच पहिल्या मजल्याचा वापर पंचतारांकित विश्रांतीकक्षासाठी करण्यात येणार आहे.
याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अजय कुमार यांच्याकडे विचारणा केली असता यावर सध्या केवळ विचार सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की पहिल्या मजल्यावरील आरक्षण केंद्र तळमजल्यावर हलवून त्या ठिकाणी विश्रांतीकक्ष उभारण्याचा विचार सुरू आहे. याबाबत अद्याप प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही.
मुंबईसह अनेक स्थानकांवर सुविधा
सध्या देशात काही ठिकाणी पंचतारांकित विश्रांतीकक्ष आहेत. यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अहमदाबाद, विजयवाडा, आग्रा कॅन्टोन्मेंट, भागलपूर, जयपूर, कोलकता, नवी दिल्ली, सालेम, सिलीगुडी, तंजावूर, थिविम, विशाखापट्टणम या स्थानकांचा समावेश आहे. आगामी काळात इतर स्थानकांवर ही सुविधा सुरू होणार आहे, अशी माहिती आयआरसीटीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. आयआरसीटीसीकडून ही विश्रांतीगृहे चालवली जातात.
हेही वाचा – पिंपरीत कापड विक्री व्यवसायिकाला हप्त्यासाठी दुकानासह जिवंत जाळण्याची धमकी!
प्रवासी संघटनांचा विरोध
आलिशान विश्रांतीकक्षाला रेल्वे प्रवासी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, की रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढत आहे. प्रवासी स्थानकाबाहेर उन्हापावसात उभे असतात. सर्वसामान्य प्रवाशांसाठी निवारा करण्याऐवजी सशुल्क सुविधा उभारल्या जात आहेत.