सर्वसामान्यांना किफायतशीर दरात जेनेरिक औषधे मिळावीत, या उद्देशाने पंतप्रधान भारतीय जनौषधी योजना राबवली जात आहे. या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आता रेल्वेने पुढाकार घेतला आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या डब्यांवर या योजनेचे महत्त्व सांगणारा मजकूर आता दिसू लागला आहे.
पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजना ही केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध विभागाची प्रमुख योजना आहे. या योजनेतून अत्यंत किफायतशीर दरात दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वसामान्यांच्या उपलब्ध होत आहेत. या योजनेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ७ मार्चला जनऔषधी दिवस साजरा केला जातो. या वर्षीचा हा पाचवा जनऔषधी दिवस आहे. या निमित्त देशभरात १ ते ७ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
हेही वाचा >>> ‘इतके मोठे तुम्ही नक्कीच नाही’…, हेमंत रासने यांची आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका, समाजमाध्यमातून वाक़युद्ध
या योजनेची माहिती जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या डब्यांना आकर्षक विनाइल रॅपिंग करण्यात आले. त्यावर योजनेचे महत्व आणि उद्देश समजावून सांगणारा मजकूर देण्यात आला आहे. ही गाडी पुण्यातून नुकतीच दानापूरला रवाना करण्यात आली.
देशात ९ हजार जनऔषधी केंद्रे
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ हजारहून अधिक जनऔषधी केंद्रांद्वारे १ हजार ६०० हून अधिक औषधे आणि दोनशेहून अधिक शस्त्रक्रिया साधने परवडणाऱ्या किमतीत वितरीत केली जात आहेत. या जेनेरिक औषधांची किमत बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या तुलनेत ५० ते ९० टक्के कमी आहे.