रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. रेल्वेच्या पुणे विभागात मागील अकरा महिन्यांत तब्बल तीन लाखांहून अधिक फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून रेल्वेने २२ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.
हेही वाचा >>> “…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, परभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान
एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या ११ महिन्यांच्या कालावधीतील विनातिकीट प्रवाशांवरील दंडात्मक कारवाईची आकडेवारी रेल्वेच्या पुणे विभागाने जाहीर केली आहे. विनातिकीट प्रवाशांची संख्या ३ लाख १२ हजार १५९ आहे. त्यांच्याकडून २२ कोटी ५२ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. फेब्रुवारी तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान २० हजार ५३७ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून १ कोटी ७३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा >>> पुणे : आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
रेल्वेच्या तपासणी मोहिमेत अनेक प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळले आहेत. फेब्रुवारी महिन्यात अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ६ हजार ८४३ आहे. त्यांच्याकडून ४० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १७१ जणांकडून १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असेही आवाहनही झंवर यांनी केले आहे.