पुणे : रेल्वेकडून वातानुकुलित श्रेणीतील प्रवाशांना चादरी आणि हात टॉवेल दिले जातात. या वस्तू देण्यासाठी पूर्वी कागदी पिशव्यांचा वापर केला जात होता. आता रेल्वेने या कागदी पिशव्यांना मोफत पर्याय शोधला आहे. या पिशव्यांसाठी जाहिरातदार असल्याने त्या रेल्वेला मोफत मिळतात आणि प्रवासीही त्या पिशव्या पुन्हा वापरण्यासाठी घरी घेऊन जाऊ शकतो.
हेही वाचा >>> पुणे: भारती विद्यापीठ भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’ कारवाई
रेल्वेत तपकिरी रंगाच्या कागदी पिशव्यांचा वापर प्रवाशांना चादर आणि हात टॉवेल देण्यासाठी होतो. या पिशव्या लगेच फाटतात. तसेच, त्यांच्यामुळे कचराही जास्त होतो. यावर आधार कॉर्पोरेशन लिमिटेडने पारंपरिक कागदी पिशव्यांचा वापर बंद करण्याचे रेल्वेला सुचविले. यामुळे कागदी पिशव्यांच्या उत्पादनासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी होईल आणि प्रवाशांना पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या देण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला. नवीन पिशव्या सुरुवातीला पारंपरिक कागदी पिशव्यांपेक्षा महाग असल्या, तरी पुरवठादाराने त्या मध्य रेल्वेला मोफत पुरवण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी त्यांनी या पिशव्यांवर जाहिरातींसाठी विशेष हक्क मागितले.
मध्य रेल्वेने हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला. सुरुवातीला मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये तो राबिवण्यात आला. आधार कॉर्पोरेशनने मध्य रेल्वेला वर्षभरात सुमारे एक कोटी पिशव्या पुरविल्या. या व्यवस्थेमुळे पूर्वी कागदी पिशव्यांवर होणारा वार्षिक १.५ कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे.
हेही वाचा >>> लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; वाहतुकीचा बोजवारा
पाच वर्षांत साडेसात कोटींची बचत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यासाठी ई-निविदेद्वारे खुली निविदा मागवली होती. आधार कॉर्पोरेशनला मुंबईच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यांमध्ये जाहिरातीसह पिशव्या पुरवठ्यासाठी निविदा मिळाली. कंपनी मध्य रेल्वेला एक कोटी पिशव्या पुरविणार आहे. त्यामुळे या ५ वर्षांच्या कालावधीत रेल्वेती ७.५ कोटींची बचत होईल. कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह (एमटीडीसी) अनेक जाहिरातदार पिशव्यांसाठी मिळत आहे.