लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: रेल्वेकडून पुण्यातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. पुणे जिल्ह्यात अनेक उद्योग असल्याने रेल्वेकडून ही वाहतूक वाढवण्यासाठी पावले उचलण्यात आली होती. याला अखेर यश मिळाले असून, पुण्यातून पहिली विशेष कार्गो गाडी रवाना झाली. या गाडीतून प्रामख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांची (व्हाईट गुड्स) वाहतूक करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे विभागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु, पुण्यातून रेल्वेने तुरळक संख्येने पार्सल पाठवले जायचे. हे पार्सल संबंधित ठिकाणी जाणाऱ्या गाडीला पार्सलचा डबा लावून पाठवले जायचे. त्यामुळे पार्सलद्वारे महसूल वाढवण्यासाठी विभागीय व्यवसाय विकास पथकाने रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीतील उद्योगांशी संपर्क साधला होता. तेथील विविध कंपन्यांशी चर्चा करण्यात आली. याला उद्योगांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पहिली कार्गो विशेष गाडी खडकी येथून संकरेल-हावडा येथे रवाना झाली.

आणखी वाचा-निगडीत पलटी झालेल्या टँकरमधील गॅस गळती रोखण्यात १४ तासांनी यश

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या व्यवसाय विकास पथकाने ही कामगिरी केली आहे. या पथकाच्या प्रयत्नांमुळे आणि किफायतशीर दर, सुरक्षित परिचालन आदी वैशिष्ट्यांमुळे रेल्वेला नवीन व्यवसायाची संधी पुण्यातून उपलब्ध झाली आहे.

कोट्यवधींचा महसूल मिळणार

रेल्वेच्या पुणे विभागाकडून नियमितपणे राष्ट्रीय स्तरावर ऑटोमोबाईल, साखर, पेट्रोलियम उत्पादनांसह विविध वस्तूंची वाहतूक केली जाते. आता कार्गो विशेष गाडी संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या गाडीला १४ डबे असून त्यात ९० टक्के इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत. त्यात एसी, फ्रीज, टीव्ही यांचा समावेश आहे. त्यांचे एकूण वजन ३२२ टन असून, यातून रेल्वेला पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. पुणे रेल्वे विभागातून दरमहा ७ ते ८ पार्सल गाड्या सोडल्या जाणे अपेक्षित आहे. त्यातून रेल्वेला दरमहा १ ते सव्वा कोटी रुपये महसूल मिळणार आहे.