पुणे : कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यभरात मोसमी पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की सध्या राज्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण नाही. किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ३० ते ४० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा आणि विजांचा कडकडाट, ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात वातावरण ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील काही जिल्हेवगळता राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड, पुणे (घाट परिसर) औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.