राज्याच्या अनेक भागात मोसमी पावसाने (मान्सून) हजेरी लावली असली तरी पुण्याला मात्र त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. असे असले तरी जून महिन्याच्या आकडेवारीनुसार पावसाने सरासरी गाठल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पुण्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच जोरदार वादळी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने पूर्णपणे तोंड फिरवले आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, दोन-तीन दिवसांनंतर पुण्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेत जून महिन्यात आतापर्यंत ८२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत १.१ मिलिमीटरने जास्त आहे. मान्सून पुण्यात ८ जून रोजी दाखल झाला. त्यानंतरच्या आठ-दहा दिवसांत पुण्यात दमदार पाऊस पडलाच नाही. तरीसुद्धा हा आकडा असण्याचे कारण म्हणजे पुण्यात पडलेला वादळी पाऊस. मान्सूनच्या आगमनाआधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुण्यात मोठा वादळी पाऊस पडला. त्या पावसाने पुण्याची जूनच्या पावसाची आकडेवारी भरून काढली. त्यानंतर मात्र पावसाने तोंड फिरवले. दोन-तीन मिलिमीटर पावसाचा अपवाद वगळता गेल्या दहा दिवसांत पुण्यात मोठा पाऊस पडलेला नाही. अजूनही दोन-तीन दिवस मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही. गेले काही दिवस आकाशात काळे ढग जमा होत आहेत. मात्र, त्यातून पाऊस पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात दमदार पाऊस पडण्यासाठी विशिष्ट प्रकारची हवामानाची स्थिती निर्माण व्हावी लागते. ती पुण्यात तयार न झाल्यामुळे पुण्याला मोसमी पावसाने हुलकावणी दिली आहे, असे पुणे वेधसाळेकडून सांगण्यात आले.
पुढील पावसाचा अंदाज काय?
पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन-तीन दिवसांत तरी मोठय़ा संततधार पावसाची शक्यता नाही. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाली तर पुण्यात चांगला पाऊस पडेल. तोवर त्याची वाटच पाहावी लागणार आहे.
‘म्हणून पुण्यात पाऊस नाही’
‘‘पुणे शहराचा समावेश पर्जन्य छायेच्या प्रदेशात होतो. त्यामुळे येथे पावसाचे प्रमाण कमीच आहे. पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अनुकूल स्थिती निर्माण झाली तरच पुण्यात मोठय़ा संततधार पावसाची शक्यता असते. त्यासाठी अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणे आणि पूर्वेला बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे या बाबी आवश्यक असतात. ती नसेल तर पुण्यापर्यंत कोरडे वारेच पोहोचतात. ही स्थिती या वेळी अजूनही तयार झालेली नाही. त्यामुळे सध्या पुण्यात अपेक्षित मोसमी पाऊस पडलेला नाही. मान्सूनचे आगमन होण्याआधी पडलेल्या वादळी पावसामुळे आकडेवारी मात्र भरून निघाली आहे.’’
– डॉ. सुनीता देवी, पुणे वेधशाळेच्या संचालक

Story img Loader