सोमवारी आणि मंगळवारी शहरात झालेल्या पावसानंतर आजही शहरात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी (६ मार्च) होळीच्या दिवशी शहराच्या विविध भागांमध्ये सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी धूलिवंदनाच्या दिवशीही शहरात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> अवकाळीने दाणादाण; रब्बी पिकांसह द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई पिकांचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसभराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेलेले पाहायला मिळत आहे. पावसाचे आगमन होईपर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये सुमारे ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. किमान तापमानही आता सातत्याने १५ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. शहरात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम असून दुपारनंतर आकाशही ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळपासून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये मिळून ३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.