राज्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी व शनिवारी पावसाळय़ाप्रमाणे पाऊस पडला. त्यामुळे रब्बीच्या उभ्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाण्याची आणि काही भागात रब्बीच्या पेरण्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवसांतही राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे पुढील आठवडय़ातही कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व पावसाच्या तुरळक सरी असे वातावरण असेल.
या वेळच्या पावसाळय़ात पावसाचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. बहुतांश ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात पावसाने विशेष हजेरी लावली नाही. त्यामुळे संपूर्ण मराठवाडय़ासह राज्याच्या तब्बल १२५ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. शनिवारी दिवसभरात सर्वच भागात चांगला पाऊस झाला. पुणे (१५.७ मिलिमीटर), कोल्हापूर (१७.८), सातारा (४०५), मालेगाव (१७), नाशिक (३.७), रत्नागिरी (२३.४), मुंबई-सांताक्रुझ (३.२), औरंगाबाद (२८.४), बुलडाणा (४३), अकोला (७.७) अशा विस्तृत प्रदेशावर त्याची नोंद झाली. याशिवाय इतर भागातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. हीच स्थिती पुढे कायम राहणार असल्याने पुढील आठवडय़ात तरी थंडी अवतरण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
आताच्या पावसाचे कारण काय?
‘‘नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणे अपवादात्मक नाही. या दिवसांत दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळमध्ये ईशान्य मान्सूनचा पावसाचा जोर असतो. आता या वाऱ्यांचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून ते दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र तसेच, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.’’
– पुणे वेधशाळेतील सूत्र
पिकांसाठी काही प्रमाणात दिलासा
‘‘रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत त्या भागात मातीत फारशी ओल नव्हती. या पावसामुळे ती वाढेल आणि पिकांना फायदा होईल. जिथे या पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा काही ठिकाणी रब्बीच्या पेरण्या पुन्हा होऊ शकतील. त्याचा हरभरा, करडी, जवस अशा पिकांच्या पेरण्यांना फायदा होईल. ज्यांनी खरिपाच्या कापूस, तूर अशा पिकांची उशिरा पेरणी केली. त्यांनाही हा पाऊस फायद्याचा आहे. मात्र, भात, सोयाबीन ही पिके काढणीला आलेली असल्याने त्यांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.’’
– उमाकांत दांगट, राज्याचे कृषी आयुक्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा