पुण्यासह राज्यात काही ठिकाणी सोमवारी वादळी पावसाच्या सरी बरसल्या. गेल्या दोन दिवसांपासून कुठे ना कुठे सुरू असलेल्या या पावसाचा हवामानाच्या जागतिक घटकांशी संबंध नसून, तो स्थानिक बदलांचाच परिणाम असल्याचे पुणे वेधशाळेकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्राच्या काही भागात दोन-तीन दिवसांपासून वादळी पावसाने हजेरी लावली. विरुद्ध दिशांनी येणारी वारे एकमेकांना येऊन मिळत असल्याने सध्या छत्तीसगड ते तामिळनाडू या राज्यांच्या दरम्यान हवामानाची विशिष्ट स्थिती आहे. त्यामुळे या पट्टय़ात वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या पट्टय़ात महाराष्ट्रसुद्धा येत असल्याने येथे काही ठिकाणी वादळी पाऊस पाहायला मिळत आहे, असे हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. मराठवाडय़ात उस्मानाबादसह अनेक ठिकाणी रविवारी रात्री मोठा पाऊस पडला.
त्यानंतर सोमवारी महाबळेश्वर येथे पावसाच्या सरी बरसल्या. त्याचबरोबर दुपारनंतर पुणे, पिंपरी-चिंचवड भागातही पावसाने मोठी हजेरी लावली. पुण्यात सुमारे पाऊण तास ते एक तास मोठा पाऊस पडला. पाऊस सुरू झाला, तेव्हा सुरुवातीला रस्ते निसरडे होऊन अनेक दुचाकी वाहने घसरली. त्यानंतर झालेल्या मोठय़ा पावसाने अनेक रस्त्यांवरून पाणी वाहिले.
‘कोकण वगळता राज्यात इतरत्र
पुढील दोन दिवसांत पाऊस’
वेधशाळेच्या अंदाजानुसार, कोकण विभाग वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात येत्या दोन दिवसांत वादळी पावसाची शक्यता आहे. यापैकी अनेक ठिकाणी पाऊस पडेल. गुरुवारनंतर मात्र ही स्थिती बदलून पावसाची स्थिती निवळण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा