हिमालयीन प्रदेशातील वारे दक्षिणेकडे आले असून कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानवर निर्माण झाल्यामुळे मुंबई, नाशिक आणि कोकणात शनिवारी पाऊस झाला. या वाऱ्यांच्या प्रभावामुळेच राज्यात थंड वारे वाहात असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. येत्या चोवीस तासात ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे (८.२) नोंदले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंड वारे वाहात असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. शनिवारी मुंबईत ८, डहाणूत ५ आणि नाशिक येथे १ मिलिमीटर पाऊस झाला. त्याबरोबरच उत्तर कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या. येत्या चोवीस तासात कोकण आणि गोवा तसेच विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.
याबाबत पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी सांगितले की, सध्या पश्चिमेकडून वारे वाहात आहेत. हे वारे हिमालयीन प्रदेशात वाहात असतात. सध्या हिमलयातील या वाऱ्यांचा प्रभाव दक्षिणेकडे जाणवत आहे. त्याबरोबर राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे मुंबई, कोकण, नाशिक या ठिकाणी शनिवारी पाऊस झाला. त्याबरोबरच गुजरात, राजस्थान आणि दिल्ली येथे पावसाची नोंद झाली. हवामानातील बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंड वारे वाहात असून ढगाळ हवामानही निर्माण झाले आहे. हा परिणाम तात्पुरता असून रविवारनंतर ढगाळ वातावरण कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शनिवारचे कमाल तापमान:
पुणे १०.६, अहमदनगर ८.२, जळगाव ११.६, कोल्हापूर १४.८, महाबळेश्वर ९.६, मालेगाव ११.६, नाशिक ९.९, सांगली १४.१, सातारा ११.७, सांताक्रुज १७.६, डहाणू १८.३, औरंगाबाद ११, उस्मानाबाद १२.८, परभणी १४.६, अकोला १४.७ आणि नागपूर १६.२.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा