पावसाचे आगमन तब्बल महिनाभर लांबल्यामुळे निवांत असलेल्या पुणेकरांना आता तय्यार व्हावे लागेल.. कारण या आठवडय़ाच्या अखेरीस पाऊस सुरू होणार असून, तो पुढचा आठवडाभर मुक्काम ठोकणार आहे. त्यामुळे छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला-शूज, सायकल-बाइक्सचा चिखल उडू नये म्हणून मडगार्ड, मोटारींची देखभाल, घरातल्या घरात कपडे सुकवण्याची तयारी, बाहेर भिजणारे साहित्याला छताखाली जागा.. अशा अनेक गोष्टींची तय्यारी ठेवावी लागणार आहे. त्यासाठी आता केवळ दोनतीन दिवसच उरले आहेत.
पुण्यात यंदा पावसाने अजून तोंड दाखवलेले नाही. जून महिन्यात पडलेल्या मोजक्याच हलक्या सरी वगळता पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. १ जून ते ३ जुलै या काळात पुण्यात सरासरी १५४ मिलिमीटर पाऊस पडतो. या वेळी प्रत्यक्षात इनमीन १४ मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. गेल्या आठपंधरा दिवसांत आकाशात ढग दिसत होते, पण विशेष पाऊस पडलाच नाही. त्यामुळे पुण्याला पाणीकपातही लागू करण्यात आली आहे. या समस्यांबरोबरच गेली महिनाभर पाऊसच नसल्याने पुणेकर गाफिल आहेत. रेन कोट किंवा छत्र्यांची विक्री एरवीच्या हंगामाप्रमाणे झालेली नाही. या दुकानांमध्ये अगदीच कमी संख्येने ग्राहक पाहायला मिळत आहेत. हीच स्थिती पावसाळी चपला व इतर वस्तूंची आहे.
मात्र, आता ही स्थिती बदलणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी पुण्याच्या पावसाबाबत सांगितले, की हा आठवडा कोरडाच जाईल. पाऊस पडला तरी तो संततधार नसेल. मात्र, पुढच्या आठवडय़ात पाऊस खऱ्या अर्थाने सुरू होईल. तो आठवडाभर कायम राहील. त्याचा जोरही चांगला असेल. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानात होत असलेले बदल आपल्या पथ्यावर पडेल. पुण्याप्रमाणेच राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची स्थिती सुधारेल.
चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने आता तयारीसाठी केवळ दोनतीनच दिवस उरले आहेत. शहरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावासुद्धा झाला. वाहणारा वारा आणि हवेतील गारवा यामुळे वातावरण बदलल्याची चाहूलही लागली. त्यामुळे आता पावसाळ्याच्या तयारीसाठी दुकाने, बाजारपेठांकडे अधिक पावले वळण्याची शक्यता आहे.
आसपासच्या परिसरात पाऊस
पुणे शहरात विशेष पाऊस पडला नसला, तरी गेले तीनचार दिवसांत जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. बारामती, लोणावळा, भोर परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या मोठय़ा सरी पडल्या. आता प्रतीक्षा आहे ती पाऊस पुणे शहरात बरसण्याची. पुणे वेधशाळेचा अंदाज खरा ठरला, तर येत्या दोन दिवसांत पुणेकरांना हलक्या सरी झेलण्याची तयारी ठेवावी लागेल.
पाऊस येतोय.. आता सज्ज व्हा!
निवांत असलेल्या पुणेकरांना आता तय्यार व्हावे लागेल.. कारण या आठवडय़ाच्या अखेरीस पाऊस सुरू होणार असून, तो पुढचा आठवडाभर मुक्काम ठोकणार आहे.
First published on: 04-07-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain come ready observatory monsoon