पुणे : कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारपासून (२३ जून) मोसमी पाऊस सुरू होईल. २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तविला आहे. होसाळीकर म्हणाले, कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. मोसमी वारे संथगतीने वाटचाल करीत आहे. २३ जूनपासून राज्याच्या बहुतेक भागात पाऊस सुरू होईल. २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल. मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
‘बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे विदर्भात चांगला पाऊस उपेक्षित आहे. अरबी समुद्रातील थंडावलेल्या मोसमी वाऱ्याच्या शाखेलाही ऊर्जितावस्था येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात लवकरच पाऊस सुरू होऊ शकतो. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी राहील,’ असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
विदर्भाला दिलासा
मध्य भारतासह विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. आज, गुरुवारीही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून विदर्भाला काही प्रमाणात उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो. बुधवारी चंद्रपुरात सर्वाधिक ४२.६ अशं सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्या खालोखाल गोंदियात ४१.२, वर्ध्यात ४१, अकोल्यात ३९.८ आणि यवतमाळमध्ये ३९.७ अशं सेल्सिअसची नोंद झाली आहे.