पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पाऊस परतला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री उशीराने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. हवामान विभागाने जिल्ह्याला मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील चार दिवस धरणांच्या परिसरासह शहरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून एकूण २९.०८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणांत पावसाला सुरूवात झाल्याने खडकवासला धरण रात्री १०० टक्के भरले. त्यामुळे रात्री ११ वाजता ४२८ क्युसेक वेगाने धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. पावसाचे प्रमाण पाहून धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले होते. मात्र, धरणांच्या परिसरात पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी या धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांसह नदीतही श्रींचे विसर्जन करता येणार आहे.

Story img Loader