राज्यात विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली असताना पुणे शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला. रात्री साडेआठपर्यंत ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. येत्या चोवीस तासात गडगडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड उकाडा जणवत होता. दिवसभर आकाश भरून येत होते, तरी पाऊस मात्र पडत नव्हता. त्यामुळे अंगाची लाही-लाही होत होती. सोमवारी सकाळी आकाश भरून आले होते. दुपारी उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहा वाजता शहराच्या काही भागात पावसाला सुरूवात झाली. रात्री पावणे सात वाजल्यापासून शिवाजीनगर, शहराचा मध्य भाग, कोथरुड, हडपसर, येरवडा, पुणे स्टेशन, कात्रज आदी परिसरात पावसाला सुरूवात झाली. पंधरा ते वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला. सायंकाळी पाऊस आल्यामुळे कामावरून घरी निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्या बरोबरच पावसात भिजण्याचा आनंदही अनेकांनी घेतला. येत्या चोवीस तासात शहरात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा