केवळ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये तब्बल २६ अब्ज घनफुटांपेक्षा (टीएमसी) अधिक पाणी जमा झाले आहे. शहराला दीड वर्षांपेक्षा जास्त काळ पुरेल एवढा पाणीसाठा केवळ एका महिन्यात जमा झाला आहे.

यंदा कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली होती. तसेच पूर्वमोसमी पावसाने यंदा हजेरी लावली नाही. याशिवाय मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरूवातीला चारही धरणांमधील पाणीसाठा २.५५ टीएमसी म्हणजेच के‌वळ ८.७५ टक्के शिल्लक राहीला होता. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या परिसरात ४ जुलैपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर केवळ सहा दिवसांत म्हणजेच ११ जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हंगामात प्रथमच धरण भरल्यापासून मुठा नदीत गेल्या सहा वर्षातील लवकर सुरू करण्यात आलेला विसर्ग ठरला. ४ जुलै रोजी सुरू झालेला मुसळधार पाऊस अखेर १६ जुलैपासून काही प्रमाणात ओसरला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, चारही धरणांची क्षमता २९.१५ टीएमसी एवढी आहे. पुणे महानगरपालिकेकडून दरवर्षी १६ ते १७ टीएमसी पाणी वर्षभरात धरणांमधून उचलण्यात येते. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २१.४९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत ३.३४ टीएमसी, तर नवीन मुठा कालव्यातून एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे केवळ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये तब्बल २६ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाचे अद्याप दोन महिने बाकी असल्याने या कालावधीत चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील. परिणामी वर्षभराची पाण्याची चिंता मिटेल, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.