लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : किनारपट्टी, घाटमाथ्यावर सोमवारी (५ जुलै) पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर झारखंडवरील अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता ईशान्य मध्य प्रदेशावर आहे. त्याची तीव्रता पुढील १२ तासांत कमी होण्याचा अंदाज आहे. नैर्ऋत्य राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय आहे. या हवामानविषयक प्रणालींचा परिणाम म्हणून सोमवारी राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहील. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आणखी वाचा-जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जाणून घ्या स्तनपानाचे माता अन् बालकांसाठी फायदे…

सोमवारसाठी इशारे

नारंगी इशारा – पुणे, सातारा

पिवळा इशारा – कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ.

भाटघर धरणाच्या पाणलोटात अति मुसळधार

नगर जिल्ह्यातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अति मुसळधार पाऊस पडला आहे. शनिवारी पहाटे सहा ते रविवारी पहाटे सहा, या २४ तासांत घाटघर येथे ४७५ मिमी, भंडारदरा येथे २४५ मिमी, पांजरे येथे २४५ मिमी आणि रतनवाडी येथे ४४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणात पाण्याची आवक मोठ्या वेगाने होत असल्यामुळे धरणातून २७,११४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain is still heavy on the coast and ghatmatha today pune print news dbj 20 mrj