‘येणार-येणार’ असे गेले काही दिवस म्हटले जात असताना अखेर शुक्रवारी मान्सूनने केरळच्या किनारपट्टी गाठली असून, एकाच दमात तो पुढच्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रात नेमका प्रवेश कधी होणार, हे अरबी समुद्रात पुढील दोन-तीन दिवसांत काय घडते यावर अवलंबून असेल.
राज्याच्या बहुतांश भागात आणि मध्य भारतात सध्या तापमान वाढले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि इतरत्र उकाडय़ाने लोकांना हैराण केले आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पारा ४५ अंशांच्या वर पोहोचला आहे. नागपूर (४६.७), चंद्रपूर (४७.१), बह्मपुरी (४७.५) असे तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. मध्य भारतात असे उकाडय़ाचे वातावरण असताना केरळात शुक्रवारी मान्सून दाखल झाला. त्यासोबत तिथे दमदार पाऊसही पडला. त्याने केरळचा बहुतांश भाग आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही तो पुढे सरकला. त्याच्या पुढे सरकण्यास सध्या अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत तो कर्नाटकचा दक्षिण भाग व्यापेल. त्याचबरोबर ईशान्य भारतातही दाखल होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
त्याच्या पुढच्या प्रवासाबाबत म्हणजे तो महाराष्ट्रात कधी दाखल होणार, याबाबत मात्र अनिश्चितता आहे. अरबी समुद्रातील हवामानाची स्थिती काय राहणार, यावर त्याचा पुढील प्रवास अवलंबून असेल. हे पुढच्या दोन दिवसांत निश्चित होईल.
महाराष्ट्र प्रवेशाबाबत कोणत्या शक्यता?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले, की
– हवामानाच्या काही मॉडेल्सनुसार, अरबी समुद्रात दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ते निर्माण झाल्यावर त्याची हालचाल कशी होते व ते कोणत्या दिशेने सरकते यावर मान्सूनची प्रगती अवलंबून असेल. हे क्षेत्र निर्माण झाले आणि वायव्य दिशेला सरकले, तर मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवेश लांबणीवर पडेल.
– हे क्षेत्र निर्माण होऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकले, तर मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवेश लवकर होईल. मात्र, नेमकी काय परिस्थिती उद्भवते हे पाहण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागेल.
– अरबी समुद्रात प्रतिकूल स्थिती उद्भवली, तर मान्सून वाऱ्याची दिशा पूर्ववत होण्यासाठी आणखी स्हा-सात दिवस लागतील, त्यानंतरच तो महाराष्ट्रात पोहोचेल.

Story img Loader