पुणे : र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाने आता वेग घेतला असून, पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे आठवडय़ापासून कोकणात काही ठिकाणी, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली आदी भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. बाष्पाचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्यातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही लांबला आहे. १४ ऑक्टोबरला महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. राज्याच्या उत्तरेकडील काही भागांतून मोसमी वारे माघारी गेले असतानाच अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.

महाराष्ट्रातून मोसमी वारे १३ ऑक्टोबपर्यंत निघून जाणे अपेक्षित होते. त्यास मोठा बिलंब झाला आहे. २१ ऑक्टोबरला विदर्भातील बहुतांश भागातून मोसमी वारे माघारी गेले.येत्या दोन दिवसांत राज्यातून मोसमी वारे माघारी जातील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत तुरळक भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. दोन दिवसांनंतर मात्र उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे या भागांतही कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे.

पश्चिम बंगाल, ओदिशाला तडाखा 

दिवाळीच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार नसल्याचे स्पष्ट असले, तरी पश्चिम बंगाल आणि ओदिशाला त्याचा मोठा तडाखा बसणार आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढणार असून, २५ ऑक्टोबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. चक्रीवादळ पूर्व-उत्तर दिशेला पुढे जाणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालला सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. ओदिशा आणि अरुणाचल प्रदेशलाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.